संगीत विषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Posted on: March 7th, 2022 by admin

संगीत प्रमाणपत्र वर्ग 

महाराष्ट्र कल्चरल सेंटरने ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहयोगाने संगीतविषयक दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केले आहेत. ‘मराठी ललित संगीत’ हा पाच महिन्यांच्या अभ्यासक्रम असून त्यात मराठी भावगीत, नाट्यगीत, लावणी, पारंपरिक मराठी गीत इ. शब्दप्रधान संगीताचे प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाते. तर ‘संगीत आस्वाद’ ह्या चार महिन्यांच्या अभ्यासक्रमात संगीत ऐकावे कसे, त्याचा आस्वाद कसा घ्यावा याविषयीचे मार्गदर्शक दिले जाते. ह्या दोन्ही लघुअवधी अभ्यासक्रमांचे संयोजन महाराष्ट्र कल्चरल सेंटर करते, व सहभागी विद्यार्थ्यांस अभ्यासक्रमाच्या अंती ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमाणपत्र दिले जाते. अभ्यासक्रम प्रत्यक्ष स्वरूपात व आवश्यकतेनुसार ऑनलाईन माध्यमातूनही आयोजित होतो. दोन्ही अभ्यासक्रमांचे वर्ग प्रत्येक आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार असे ३ दिवस सायं. ६ ते ८ या वेळात ज्योत्स्ना भोळे सभागृहाच्या  इमारतीमधील सभागृहांत होतात. जानेवारी २०२२ पासून दोन्ही अभ्यासक्रमांच्या पहिल्या बॅचचा आरंभ झाला असून दुसरी बॅच जुलै २०२२ पासून सुरु होईल.

 

अभ्यासक्रमांविषयी संक्षिप्त माहिती –

१. मराठी ललित संगीत : ‘मराठी ललित संगीत’ ह्या अभ्यासक्रमात ‘सुगम संगीत’ वा ‘शब्दप्रधान संगीत’ म्हणून ओळखले जाणारे मराठी भावगीत, गझल, इ. प्रकार, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, लावणी, पारंपरिक गीते यांचा समावेश आहे. ह्या गानप्रकारांच्या गायनासह आवाजसाधना, शब्दोच्चार, माइकचा वापर, नोटेशन, इ. बाबींची प्राथमिक माहिती घेण्याची इच्छा असलेल्यांसाठी हा अभ्यासक्रम आहे. गायक आणि वादकांनाही हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. नामवंत कलाकारांचे प्रात्यक्षिक शिक्षण, तसेच विविध तज्ज्ञांची सप्रयोग व्याख्याने, ध्वनिमुद्रणे व लघुपट यांचा समावेश आहे.

 

२. संगीत आस्वाद : ‘संगीत कसे ऐकावे, संगीताचा आस्वाद कसा घ्यावा’ याबद्दल उत्सुकता असणारे श्रोते आणि प्रत्यक्ष संगीत शिकणारे विद्यार्थी ह्या दोन्हींसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. जगभरातील संगीतातील विविध प्रकार, लोकसंगीतापासून रागसंगीत आणि जनसंगीतापर्यंतचे अनेक प्रवाह, भारतीय शास्त्रोक्त संगीत व पाश्चिमात्य संगीत, त्यातील गायन-वादन प्रकार, वाद्ये, घराणी वा बाज, संगीताबद्दलचे आस्वादनपर लेखन इ. घटकांचा परीचय ह्या अभ्यासक्रमात करून घेता येईल. तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने, कलाकारांची प्रस्तुती, ध्वनिमुद्रणे व लघुपट यांचा समावेश अभ्यासक्रमात असेल.

 

Comments are closed.