नवी नाटके!

Posted on: March 7th, 2022 by admin

 

‘सर्व प्रश्न अनिवार्य’

ग्रामीण भागातल्या शिक्षणव्यवस्थेवर थेट भाष्य करणाऱ्या सुप्रसिद्ध कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर यांच्या    ‘सर्व प्रश्न अनिवार्य’ या गाजलेल्या कादंबरीवर आधारित हे दोन अंकी नाटक. केवळ शिक्षणव्यवस्थेत अथवा परीक्षा पद्धतीतच नाही तर आपल्या व्यक्तिगत व सार्वजनिक जगण्यात सरसकट फोफावत चाललेल्या अपप्रवृत्तींचा वेध हे नाटक घेते. सत्याला आणि तत्वांना प्रमाण मानून मार्गक्रमण करणारे देवपिंप्री गावातील माध्यमिक शाळेतील एक सच्चे शिक्षक एस. एस. सपकाळ यांची होणारी ससेहोलपट या संपूर्ण नाट्याचा गाभा आहे. मनोरंजक आणि खुमासदार प्रसंगांसोबत एकूणच व्यवस्थेविषयी गंभीर प्रश्न उभ करणारे हे नाटक विचार करायला भाग पाडते.

I मूळ कादंबरी: रमेश इंगळे उत्रादकर I नाट्य रूपांतर: कृतार्थ शेवगांवकर I  मंचवस्तू आणि प्रकाश: मिहिर ओक I गीते: प्रमोद काळे, हर्षद राजपाठक I

I संगीत: चैतन्य आडकर I नेपथ्य, दिग्दर्शन: अपूर्व साठे I

I कलाकार: अनिरुद्ध खुटवड, हर्षद राजपाठक, सूरज सातव, श्रीधर विसाळ, रणजीत मोहिते, वेदांत रानडे, अक्षय खैरे, सुधीर फडतरे, प्रतिभा वाले, गौतमी आहेर, आदित्य सरवदे, धनश्री लेले, नीलेश रोकडे, स्तिमित साने I   

 

 

 

 

‘अनुदिन अनुतापे’

जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘प्रदक्षिणा’ या सुप्रसिद्ध कथेवर आधारित असलेल्या या दीर्घांकातील सर्व व्यक्तिरेखा त्यांच्या कित्येक व्यक्तिरेखांप्रमाणे नियतीशरण आहेत, आणि ती नियती दादासाहेबांच्या रूपाने त्यांना खेळवते आहे. वास्तविक दादासाहेबांचा नुकताच देहांत झाला आहे, आणि त्यानंतर या सर्व व्यक्तिरेखांना त्यांनी रचलेले व्यूह एक एक करून उलगडत जातात. सर्वचजण त्यामुळे भावनिक, सामाजिक वा आर्थिक दृष्ट्या भरडले जातात, दुःखी होतात; पण या सगळ्याचा करता करविता आता नसल्याने दिङ्मूढ होऊन पुढील आयुष्य जगत रहातात असे या दीर्घांकाचे कथासूत्र आहे.

I मूळ कथा: जी. ए. कुलकर्णी I नाट्यरूपांतर, दिग्दर्शन आणि संगीत: प्रमोद काळे I

I कलाकार: शुभांगी दामले, चंद्रशेखर कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, केतकी फडके, ऋत्विज कुलकर्णी I

 

 

 

 

 

‘एरर कोड 1005’

नील सायमन यांच्या गाजलेल्या ‘The Prisoner of Second Avenue’ या कलाकृतीचे हे स्वैर मराठी रूपांतर. पुण्याच्या उच्चभ्रू भागात, मोठ्या घरात राहणारं एक जोडपं- ‘आयटी’ मधली गलेलठ्ठ  पगराची नोकरी, त्यानुसार उंचावतच गेलेली ‘लाईफस्टाइल’ अशा सरधोपट मार्गात अडकलेलं, पैशानं सारं काही विकत घेता येतं अशी ठाम खात्री पटलेलं! परंतु लागोपाठ घडत जाणाऱ्या अनपेक्षित आणि काही अप्रिय घटनांमुळे त्याच्या आयुष्यातलं स्थैर्यच जणू अस्थिर होऊन गेलं, पर्यायानी तिच्याही! पैशानं सारं काही विकत घेता येतं, पण शांती आणि समाधान? या प्रश्नाचं उत्तर शोधताना तो स्वतःमध्ये पुरता हरवून गेला आहे.  या अवघड प्रवासात त्याचे जवळचे नातेवाईक त्याच्या सोबत यायला तयार आहेत, पण तो?

I मूळ कलाकृती: नील सायमन (The Prisoner of Second Avenue) I स्वैर रूपांतर: अपूर्व साठे I संगीत: चैतन्य आडकर I दिग्दर्शन: सचिन जोशी I

I कलाकार: आरती गोगटे, ऋता आडकर, देवेंद्र जोशी, अमृता पटवर्धन, पुष्कराज चिरपुटकर I

Comments are closed.